विद्या प्रसारक मंडळ संचालित

महर्षी परशुराम आभियांत्रिकी महाविद्यालय , वेळणेश्वर

डॉ. विजय बेडेकरांचे व्याख्यान

“युरोपियन देशांची संस्कृत भाषेतील अध्ययनाची रुची व विकास- एक अभ्यास “

१५ व्या शतकापासून युरोपियन देशांमध्ये वैज्ञानिक  औद्योगिक व वैचारिक क्रांतीस सुरवात झाली होती. त्यामुळे ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीचा व सनातनी विचारसरणीचा पगडा कमी होऊन मुक्त वैचारिक विचार प्रणाली, टीकात्मक समीक्षा करण्याची वृत्ती या संस्कृतीचा विकास झाला. त्यामुळे युरोपियन देशांमध्ये इतर संस्कृतीच्या अभ्यासामधील रुची वाढू लागली.

फ्रान्स देशामध्ये हे बदल मोठ्या प्रमाणात व सर्वप्रथम घडून आले. या बदलामध्ये इंग्लंडपेक्षा फ्रान्स खूप प्रगत होता. त्यामुळे १५ व्या शतकापासून ते १८ व्या शतकापर्यंत लॅटीन भाषेत मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण झाले. त्याखालोखाल फ्रेन्च व जर्मन भाषेत साहित्य निर्मिती झाली. म्हणून लॅटिन, फ्रेन्च आणि जर्मन या भाषा शास्त्रीय भाषा आणि बौद्धिक संप्रेषणाच्या  भाषा म्हणून उदयास आल्या.

          याच काळात भारतची संस्कृती ही प्रगत अशी मानली जात होती. युरोपियन देशांमध्ये भारतीय संस्कृतीबद्दल मोठ्या  प्रमाणात आकर्षण होते. भारतात संस्कृत भाषेमध्ये शास्त्रीय, धार्मिक, वैचारिक ज्ञानाचा मोठा खजिना होता. वास्को –डी –गामा  सन१४९८ ला भारतात आला. सन १५१० ला गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेल्यापासून युरोपियन देशांचा संस्कृत विषयाशी संबंध आला व संस्कृत विषयाच्या अध्ययनामध्ये त्यांची रुची उत्तरोत्त्तर काळात वाढत गेली.

सर विल्यम जोन्सने चार्ल्स विलियम या त्याच्या सहकार्याच्या मदतीने १७८४ मध्ये एशियॅटीक सोसायटीची स्थापना बंगाल येथे केली. या काळात भारतीय संस्कृतीचा व संस्कृत विषयाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास झाला. अनेक संस्कृत ग्रंथ फ्रेंच व इंग्रजी भाषेत भाषांतरीत झाले. युरोपियन देशांच्या विद्यापीठांमध्ये ‘भारतविद्या’ (Ideology) या विषयाचा स्वतंत्रपणे अभ्यास होवू लागला व संस्कृत विषयावर संशोधन स्तरापर्यंत काम होवू लागले. एवढेच नव्हे तर युरोपियन देशांच्या वैचारिक प्रबोधनामध्ये संस्कृत विषयाचे योगदान फार मोठे आहे.

भारतात रक्षाबंधन हा दिवस ‘संस्कृत दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून या विषयावर डॉ. विजय बेडेकर, कार्याध्यक्ष, विद्याप्रसारक मंडळ ठाणे यांचे अभ्यासपूर्वक व्याख्यान आयोजित केले आहे. या व्याख्यानास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

 

*** निमंत्रक ****

·       डॉ.कमलाकर देसाई

(संचालक, महर्षी परशुराम आभियांत्रिकी महाविद्यालय, वेळणेश्वर)

स्थळ :- नाना फडणवीस सभागृह, वेळणेश्वर                                

दिनांक :- ३०/०८/२०१३ 

 वेळ :- सायंकाळी ६.०० वा.